छापता छापता : आमचे प्रतिनिधी गगनराव ठेंगणे यांजकडून,
मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले संकटावर मात करण्यासाठी जनतेने एकत्र येण्याची गरज असली तरी ‘स्वाइन फ्ल्यू’ च्या संदर्भात मात्र जनतेने पांगण्याची गरज आहे.
स्वातंत्र्य मिळून ६० वष्रे होऊन गेली तरी भारताने एकाही नव्या रोगाचा शोध लावला नसल्याचा आरोप रामदास कदम यांनी केल्याचे समजते. स्वाइन फ्ल्यू बाबत प्रतिक्रिया देताना देशीवादाचे खंदे पुरस्कर्ते भालचंद्र नेमाडे यांनी या विदेशी साथीचा तीव्र निषेध केला आहे. देशीवादाच्या अभ्यासासाठी ते सध्या युरोपात असल्याचे समजते.
नवविवाहितांनी हनीमूनला जाताना शक्यतो एकटय़ाने जावे अशी सूचना आरोग्यमंत्री शोभा बच्छाव यांनी केली आहे.
टीव्हीच्या वाहिन्यांमधून स्वाइन फ्ल्यूच्या विषाणूंचा वेगाने प्रसार होत असल्याचा निष्कर्ष एका सामाजिक संस्थेने काढला आहे.डिझायनर मास्क ऐवजी गोरगरीब जनतेला परवडतील असे मास्क पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी डाव्या पक्षांनी केली आहे
साथीला आळा बसावा म्हणून जरी शाळा बंद असल्या तरीही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या घरी जावून शिकवावे अशी ऑर्डर काही संस्थांनी काढल्याने शिक्षकांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला आहे.
नवनिर्माण सेनेने महाराष्ट्राच्या सीमेवर स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधक यंत्रणा ताबडतोब बसविण्याची मागणी केली आहे.
0 comments:
Post a Comment