Sunday, August 30, 2009

रविवार, २३ ऑगस्ट २००९

गणेश चतुर्थीला बादशाह आपल्या दोन्ही बेगमसह बिरबलाच्या घरी भोजनासाठी आमंत्रित होता. आरती, पूजा सर्व यथासांग झाल्यावर भोजन सुरू झाले. गणपतीचा प्रसाद म्हणून भोजनाची सुरुवात मोदकाने करावी, अशी विनंती बिरबलाने बादशहाला केली. बादशहाने एक मोदक खाल्ला. गूळ, खोबरे, केसर, वेलची असा तो एकत्रित स्वाद आणि त्यावरील तांदळाच्या पिठाचे लुसलुशीत आवरण, त्यावर तुपाची धार यामुळे बादशाह एवढा खुश झाला की, त्याने इतर पदार्थाकडे दुर्लक्ष केले आणि मोदकांवरच आडवा हात मारला. तब्येतीने मोदकांचा आस्वाद घेऊन झाल्यावर त्याने भटारखान्यात जाऊन तेथील आचाऱ्यांचीही स्तुती केली. गूळ कोणता वापरला, खोबरे कुठले आणि किती प्रमाणात वापरले अशा गोष्टींचीही आस्थेनं चौकशी केली. तृप्त मनाने विडा खाऊन बादशाह पालखीत बसून राजमहालात परत आला. मध्ये एक-दोन दिवस गेले आणि बादशहाला पुन्हा मोदक खाण्याची लहर आली. लगेचच भटारखान्यात निरोप पाठवला गेला. भटारखान्याच्या प्रमुखाने बिरबलाच्या घरी जाऊन सर्व नीट समजावून घेतले आणि मोदक सिद्ध केले. वाफाळलेले मोदक, त्यावर लोणकढी तूप पाहून बादशहा खुश झाला. परंतु मोदकाचा घास घेताच त्याचा चेहरा नाराजीनं भरला. ‘इसमें वो स्वाद नही, इसमें वो बात नहीं’ म्हणत त्यानं मोदकांची थाळी बाजूला सारली. पुढले दोन-तीन दिवस बादशहाचे आचारी प्रयत्न करत होते. परंतु मोदक काही ‘ती’ चव देत नव्हते. अखेर बादशहाने बिरबलाच्या भटारखान्यातील आचाऱ्यांना बोलावून घेतले आणि त्याला मोदक करावयास सांगितले. त्याने केलेले मोदकसुद्धा बादशहाला आवडले नाहीत आणि तो संतापला. भटारखान्यातील सर्वाना त्याने कामावरून काढून टाकले. हे कळताच बिरबल बादशहाला भेटावयास गेला व म्हणाला, ‘खाविंद, दरवर्षी तुमचा आवडता आचारी, इदच्या वेळी शीरखुरमा करतो. त्याच्या हातचा शीरखुरमा खाऊन बघा, म्हणजे तुमची उदासी जाईल, तोंडाला चव येईल? ही कल्पना बादशहाला आवडली आणि तसा हुकूम देण्यात आला. नक्षीदार चांदीच्या भांडय़ात मखमली आच्छादनाखाली शीरखुरमा आला. बादशहाने प्रसन्न चेहऱ्याने त्यातील चमचाभर जिन्नस चाखला आणि मग तोंड वाकडे करत म्हणाला, ‘बिरबल, इसमें भी वो बात नहीं.’ त्यांना कुर्निसात करीत बिरबल म्हणाला, ‘खाविंद, काही पदार्थ त्या त्या दिवसाच्या विशिष्ट मन:स्थितीत अधिक चवदार लागत असतात. ती चव त्या दिवसाची असते आणि त्यामुळे त्या विशिष्ट दिवशीच येते. त्यामुळे तुम्हाला पाहिजे तसे मोदक आता पुढील वर्षीच मिळू शकतील. बादशहाच्या मनातली खंत पळून गेली आणि मग दोघांनी अकस्मात लाभलेला शीरखुरमा पोटभर चापला. अर्थात विडा वगैरे खाऊन घरी जाण्याची संधी यावेळी बिरबलाने घेतली.

0 comments:

About This Blog

Blog Archive

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP