रविवार २३ ऑगस्ट २००९
रविवार २३ ऑगस्ट २००९
सूत्रधारानं गण म्हणायला सुरुवात केली तरी रंगमंचावर गणपतीचा पत्ता नव्हता. एरवी सूत्रधारानं माइकवर ‘करू या नमन’ असं म्हणताच ‘गणपतीला’ हा शब्द येण्यापूर्वीच केशा पिंपरे चेहऱ्यावर गणपतीचा मुखवटा चढवून रंगमंचावर उजव्या बाजूनं प्रकट होत असे. आज मात्र केशाचा पत्ता नव्हता. रंगमंचामागं सगळीकडे प्रत्येकजण एकमेकांना ‘आरं केशा कुटं गेला? आरं गेलं कुटं हे बेणं? आन मुखवटय़ाचा बी पत्त्या न्हाय!’, असं सांगत होता. आणि तिकडे स्टेजवर सूत्रधार ‘करू या नमन’ एवढीच ओळ वारंवार म्हणत खाणाखुणा करत होता. रंगमंचावर गणपती प्रकट झाल्याशिवाय त्याला ‘गणपतीला’ हा शब्द म्हणता येत नव्हता. प्रेक्षकांत चुळबूळ सुरू झाली. रेकॉर्ड अडकल्यासारखं ‘करू या नमन, करू या नमन’ सुरू होतं.. आणि अखेर उजव्या बाजूनं केशा पिंपरे श्री गजाननाचा मुखवटा चढवून रंगमंचावर आला आणि आशीर्वादाची पोज घेऊन उभा राहिला. सूत्रधारानं गण पूर्ण करायला घेतला-
करू या नमन गणपतीला
पारोतीच्या लाडक्या लेकाला
शंकराच्या लाडक्या लेकाला
आन् करू या नमन..
त्याचं नमन मध्येच तोडून गणपतीनं त्याला खडसावलं-
‘काय रं, आज जेवला न्हाईस का? गण म्हणतूस का पिपाणी वाजवतूस?’
गणपतीच्या या हल्ल्यानं सूत्रधार बावचळला. त्याला हा हल्ला अनपेक्षित होता. परंतु गणपतीचा मुखवटा घातलेल्या केशाकडून आपला असा पाणउतारा तो कसा सहन करणार? त्यानं उलट वार केला.
‘हे काय देवा, तुमी आज रातच्याला मोदक खाण्याचं आवतन दिलं म्हणून मी दिवसभर उपास केला..’
मुखवटय़ाआडचा केशा गप्प थोडीच बसणार होता! त्याने मुखवटय़ाचा चेहरा सूत्रधाराकडे वळवला आणि म्हणाला, ‘बायकूसंग भांडलास, तिनं आज चूल पेटवली न्हाय म्हणून हॉटलात जाऊन भजे खाऊन आलास. घरची लक्ष्मी उपासी आसल्यावर गणपतीच्या नमनाला आवाज कसा लागंन रं..?’
प्रेक्षकांना वाटलं- वग सुरू झाला. सूत्रधार करवादला. हळू आवाजात म्हणाला, ‘केशा, घरच्या भानगडी हितं नकू सांगूस. न्हाईतं तुजंबी समदं भाईर काढीन..’
पण केशानं तिकडं दुर्लक्ष केलं आणि नृत्याची पोज धारण करीत म्हणाला,
‘आरं सूत्रधारा, सत्य सांग जरा
वर्गणी किती जमली
पावत्या किती फाडल्या
आन मंडळाच्या पैशात
किती बिडय़ा वढल्या..’
आता मात्र सूत्रधार दात-ओठ खात केशाच्या अंगावर धावला आणि विंगेत पाहत ओरडला- ‘पडदा पाडा, पडदा पाडा..’ पण लोकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यामुळं पडदा पाडायची कोणाची हिंमत झाली नाही. सूत्रधार सावध झाला.
’ ’
सूत्रधारानं मग किल्ला लढायचं ठरवलं.
‘देवा, आमचा सगळा वेव्हार पारदर्शी आसतो. कायबी झाकून ठिवत न्हाय आमी..’
‘बराब्बर हाये! मोदकासाठी खवा घेतला, त्यातला आर्धा खवा तुझ्या घरी गेला, त्यावढा मात्र झाकून ठिवलाय.’
‘देवा, आरोप करताना पुरावा द्याचा असतो हे इसरू नका.’
‘मग कुणीबी उठावं आन् तुझ्या माजघरातल्या उजव्या कपाटात पांढऱ्या फडक्यात काय बांधून ठिवलं हाय, ते पाहून यावं..’
सूत्रधार मनातून चरकला. केशाची मजल माजघरापर्यंत जावी आन् बायकोसोबतचं भांडणही त्याला कळावं? सूत्रधारानं प्रतिहल्ला चढवला-
‘हे बघ केशाऽऽऽ’
मुखवटा इकडे तिकडे पाहू लागला..
‘केशा? कोण केशा? आरं सूत्रधारा, गणपती हाय मी.. गणपती!’
‘हितं आपण नाटक कराया आलो हाओत. हितं उगा कायबी बोलाचं न्हाय..’
‘म्हंजी हितं समदं नाटक कराचं? कायबी खरं बोलाचं न्हाय?’
‘तसं न्हाय म्हणत मी. हितं तू गणपती हाय. गुमान आपलं कवतिक आयकाचं आन् पुढल्या नटांना त्येंचा पार्ट करायला मोकळं कराचं..’
‘बरं, हा ऱ्हालो ऊबा. म्हण गण..’ गणपती टेचात उभा राहिला. सूत्रधारानं पडेल चेहऱ्यानं गण पूर्ण केला. लोकांनी बेफाम टाळ्या वाजवल्या.
सूत्रधारानं गण संपवून वग सुरू केला आणि रंगमंचाच्या मागं येऊन तो एका खूर्चीवर बसला. त्यानं घाम पुसला आणि स्वत:शीच बडबडला- ‘या केशाला बघतूच आता. याला आजचे पैसे देऊ नका रं. लय आंगात आकी ह्येच्या..’
सूत्रधारानं बाजूला पाह्यलं तर हातात गणपतीचा मुखवटा धरून गरीब चेहऱ्यानं केशा उभा होता. तो म्हणाला, ‘माफी कर मला. आरं, मुखवटा कुठं ठेवला, तो सापडतच नव्हता. मंग शेवटी सापडला कपाटामागं. तुजा आज लय खोळंबा झाला आसंल माज्यापायी. माफी कर मला.. येळंवर येता न्हाय आलं. लय धावत आलो मी- पर वग सुरू झाला व्हता. कसं जमवलं गणपतीबिगर?’
आणि सूत्रधाराला दरदरून घाम फुटला..!
0 comments:
Post a Comment