रविवार, ६ सप्टेंबर २००९
| |
स्वत:चाच शीतल प्रकाश अंगभर पांघरून चंद्र पहुडला होता. त्याला काही केल्या झोप लागेना. त्यानं डोळे उघडून एकदा सभोवार पाहिलं. या विश्वाच्या पसाऱ्यात आपण किती क्षुल्लक आहोत, याची त्याला परत जाणीव झाली. त्याच्या बाजूलाच उगवलेल्या एका टपोर चांदणीकडे त्यानं चोरून पाहून घेतलं. एकदा त्यानं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तडकून त्याला ती म्हणाली होती, ‘तुला स्वत:चा प्रकाश नाही. असा स्वत:च्या इच्छेविरुद्ध पृथ्वीभोवती भटकत राहतोस. तुझं म्हणावं असं तुझ्याकडे काय आहे? फक्त काळे डाग!’ त्या दिवसापासून तो खंगत चालला होता. तेवढय़ात त्याला प्रकाशाचा एक लहानसा ठिपका दिसला आणि घरघर ऐकू आली. ‘हे काय नवीन?’ म्हणून तो कुतूहलानं पाहू लागला. मग ती प्रकाशमान वस्तू चंद्राच्या कक्षेत आली आणि चंद्राभोवती फिरू लागली. ती वस्तूही चंद्राकडे कुतूहलानं बघत होती. मग तिनंच आपणहून संवाद सुरू केला..
‘‘हाय!’’
‘‘हाय!’’
‘‘मी चांद्रयान-१.’’
‘‘हं! म्हणजे तू चार दिवसांचा सोबती आहेस तर! मला वाटलं, चला- विश्वविधात्यानं माझा एकटेपणा जावा म्हणून पाठवलं कुणालातरी!’’
‘‘अरे, पण वर्षभर आहेच ना तुझ्यासोबत मी आता!’’
‘‘माझ्यात असं काय दडलेलं आहे कुणास ठाऊक! तुम्ही सारखे येता आणि चौकशा करून जाता.’’
तेवढय़ात चांद्रयानातून कॅमेऱ्याचे फ्लॅश सुरू झाले.
‘‘अरे.. अरे, किती फोटो काढणार आहेस माझे?’’
‘‘भरपूर फोटो हवे आहेत. तुझ्याभोवती फिरताना जेव्हा जेव्हा मला वाटेल तेव्हा तेव्हा मी क्लिक् क्लिक् करत राहणार!’’
‘‘मग एक काम करशील माझं?’’ चंद्र हळव्या सुरात म्हणाला.
‘‘बोल. आता आपण मित्र आहोत..’’ चांद्रयान म्हणाले.
आपला स्वर अधिकच मधाळ करत चंद्र म्हणाला, ‘‘त्यातला एखादा चांगला फोटो त्या टपोर चांदणीला दाखव ना. तिला वाटतं, मी म्हणजे फक्त काळे डाग!’’
‘‘हं! बघू या. तुझ्यात काही इंटरेिस्टग सापडू तर दे!’’ म्हणत चांद्रयान परत कामाला लागलं.
‘‘अरे, आणखी जवळ ये ना!’’ चंद्र म्हणाला.
‘‘अरे बाबा, माझंही माणसांसारखंच. हाती नाही येणे, हाती नाही जाणे.. मला आज्ञा आहे तुझ्यापासून शंभर किलोमीटर अंतर राखून राहायची..’’
चांद्रयान शोधक नजरेनं, निरनिराळी उपकरणं वापरत चंद्राकडे निरखून पाहत होते. अखेर न राहवून चंद्रानंच विचारलं, ‘‘तुला काहीतरी ऑर्डर्स असतील ना? अमूक शोध, तमूक दिसतं का बघ..’’
‘‘हो, आहे ना. तुझ्यावर पाणी दिसतं का, बर्फ दिसतो का, तुझ्या जमिनीचा पोत कसा आहे, असं बरंच काय काय..’’
‘‘बर्फ आणि पाणी? म्हणजे बहुधा पिकनिक स्पॉटचा शोध सुरू आहे वाटतं. बाकीचा मुद्देमाल इथं नाही मिळणार. तो पृथ्वीवरूनच आणावा लागेल!’’
परत एक फोटो काढत यान म्हणाले, ‘‘तुला माणसांच्या सवयींची चांगलीच ओळख दिसतेय..’’
‘‘अरे, हजारो वर्षे पृथ्वीभोवती फिरतो आहे मी. तिथली माणसं निरखण्याशिवाय दुसरा उद्योग तरी काय आहे मला?’’
‘‘पण माणसं तुझ्या फार प्रेमात आहेत बरं! ’’
‘‘या माणसांचं काही सांगू नकोस. यांना म्हणे सत्याचा शोध घ्यायचा असतो. आता कळलं ना- माझ्या पृष्ठभागावर दगडधोंडेच आहेत! तरीही बायकांना ‘चंद्रमुखी’ म्हणायचं बंद करतात का ही माणसं? यांना सत्याचा शोध घ्यायचा नसतो. मनात जे असतं, तेच सत्य व्हावं असं वाटत असतं यांना!’’
‘‘अरे , कशाला एवढा विचार करतोस?’’
‘‘कंटाळा आलाय रे वर्षांनुर्वष असं फिरत राहण्याचा. कधी कधी वाटतं-थांबावं एकाच जागी आणि कक्षा सोडून जावं भरकटत कुठंतरी!’’
‘‘ बघ एकदा करून!’’
‘‘नाही करता येत ना मित्रा! या विश्वाच्या पसाऱ्यात आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याचे काही नियम आहेत.’’
वातावरण गंभीर होऊ लागलं तसं यान म्हणाले, ‘‘सांग ना मला तुझ्या पृष्ठभागावर कुठं पाणी आहे, कुठं बर्फ आहे? मी आपला चटकन् फोटो काढतो आणि जातो परत!’’
खळाळून हसत चंद्र म्हणाला, ‘‘तूच म्हणालास ना मघाशी, हाती नाही येणे, हाती नाही जाणे..’’
‘‘हं! आहे खरं तसं!’’ यानाने एक सुस्कारा सोडला. मग चंद्र म्हणाला, ‘‘समज माझ्याकडे भरपूर पाणी आहे, बर्फ आहे.. तर?’’
‘‘तर काय? इथं वस्ती करता आली तर माणसं येतील राहायला!’’
‘‘मग?’’
‘‘मग,इथून मंगळावर जातील!’’
‘‘मग?’’
‘‘मग तिथून आणखी कुठंतरी! कदाचित दुसऱ्या सूर्यमालेत जातील!’’
‘‘पण हे सगळं कशासाठी?’’
‘‘जे ठाऊक नाही, ते जाणून घेण्याच्या इच्छेपायी!’’
‘‘पण मग माणसं आधी एकमेकांच्या मनातलं जाणून घेण्याचा प्रयत्न का नाही करत? ते जास्त सोपं नाही का?’’
चंद्राचा प्रश्न ऐकून चांद्रयान गडबडलं.. हलू लागलं आणि त्याचं तापमान वाढू लागलं!
‘‘माझी कूलिंग यंत्रणा बंद पडली आहे आणि त्यामुळं इतर यंत्रणाही हळूहळू बंद पडत आहेत!’’
‘‘अरे, पण अजून वर्ष व्हायचं आहे तुला इथं येऊन!’’
‘‘हो, पण मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर सापडलं नाही तर मी अस्वस्थ होतो.. तशी इनबिल्ट यंत्रणा आहे.’’
‘‘सत्तर हजार फोटो काढलेस, काय काय निरीक्षणं नोंदवलीस आणि तरीही उत्तरं मिळत नाहीत?’’
‘‘माणसं आधी एकमेकांच्या मनात काय आहे, याचा शोध का घेत नाहीत, असं विचारलंस ना तू? त्याचं उत्तर शोधत होतो मी!’’
चांद्रयानाचं तापमान वाढत गेलं, सगळी नियंत्रणं सुटली आणि ते कक्षेच्या बाहेर पडू लागलं.. चंद्रानं त्याचा निरोप घेतला आणि म्हणाला, ‘‘नशीबवान आहेस. तुला नियम मोडता आला. आता मनासारखं भरकटता तरी येईल तुला!’’
0 comments:
Post a Comment