रविवार, ३० ऑगस्ट २००९
| |
ना कोई उमंग है
ना कोई तरंग है
मेरी जिंदगी है क्या
एक कटी पतंग है..
(गाणं म्हणताना भटकत भटकत ती रेल्वेस्टेशनपर्यंत पोहोचते. मध्यरात्रीच्या वेळी पांढऱ्या साडीतली, केस मोकळे सोडलेली बाई पाहून हवालदार आधी घाबरतो. मग सावरतो आणि आपल्या मूळ स्वभावात येतो.)
हवालदार- ए बाईऽऽ, कुठं चाललीस एवढय़ा रात्री अशी एकटी?
कमळाबाई- मेरी गाडी आनेवाली है, कोई आनेवाला है..
हवालदार- सगळ्या गाडय़ा झाल्या, आता गाडीबिडी काही येणार नाही.. जा, घरी जा!
कमळाबाई (शून्यात पाहत)- मेरी गाडी आयेगी.. जरूर आयेगी!
(तेवढय़ात रिकाम्या प्लॅटफॉर्मवर एक गाडी येऊन कर्र कर्र कच् असा आवाज करून थांबते.)
उद्घोषणा- नागपूर से आनेवाले यात्रीयों का हम स्वागत करते है..
(हवालदार अवाक् आणि भयभीत. संपूर्ण गाडीतून फक्त एकच प्रवासी उतरतो. भरदार टिळकछाप मिशा, धोतर, काळी टोपी, हातात काठी आणि काखेला वळकटी. प्रवासी सावकाश चालत बाहेर येतो. कमळाबाई धावत जाते, हंबरडा फोडते आणि त्याला बिलगते.)
कमळाबाई- मोहन भैयाऽऽऽऽ!
(मोहनभैया तिला जवळ घेतात. कुरवाळतात. हळूहळू भावनांचा आवेग ओसरतो.)
मोहनभैया- ये क्या हाल बना रक्खा है कमळे? आणि कपाळ असं पांढरं का? कुंकू का नाही लावलंस?
कमळाबाई- अरे मोहनभैया, कुणाच्या नावाचं कुंकू लावू? कुणाचाच भरवसा राहिला नाही. ‘ज्याच्या हाती पतंगाची दोरी, तो पक्षाते सांभाळी’ असं म्हणतो ना आपण? पण ज्याच्या हाती दोरी आहे, त्याचे हात बांधले गेले आहेत आणि माझी अवस्था कटी पतंगसारखी झाली आहे रे मोहनभैयाऽऽऽऽ
(ती पुन्हा हंबरडा फोडते. मोहनभैया तिला थोपटतात.)
मोहनभैया- नकोस काळजी करू. मी आहे ना! आता मी बघतो सगळं. चल, अशी भूतावानी भटकू नकोस.
(दोघेही जातात. हवालदार बेशुद्ध होऊन पडलेला.)
’ ’
(मोहनभैया प्रेमानं कमळाबाईची वेणी घालून देत आहेत. कमळाबाई एक पाय लांब करून अन् एक पाय गुडघ्यात दुमडूून बसलेली.)
मोहनभैया- एक पाय का लांब केलास असा? काय झालं पायाला तुझ्या?
कमळाबाई- अरे, पडले जिनावरून.. म्हणजे.. जिन्यावरून!
मोहनभैया- जिन्यावर कशाला कडमडायला गेलीस? कितीदा सांगितलं तुला- वरच्या अंगाला जाऊ नकोस, डावीकडे झुकू नकोस..
कमळाबाई- अरे, तू लाख सांगशील भैया, पण लोकांना पटेल तर ना?
मोहनभैया- न पटेल तर काय? सरदार कोण आहे?
कमळाबाई (लाडात येऊन)- सरदार तर माझा मोहनभैया आहे..
(एक हात उंच करून गाणं म्हणते..)
शूर आम्ही सरदार आम्हालाऽऽऽ
काय कुणाची भीतीऽऽऽ
मोहनभैया- अगं, काय हा आचरटपणा? मला नीट वेणी तरी घालू दे तुझी..
कमळाबाई- वेणीफणी कर माझी.. पण मला सांग- कुणाच्या नावाचं कुंकू लावू मी?
मोहनभैया- हे बघ कमळे, गडी कसा तगडा हवा! ज्याला चार जिने नीट चढता येत नाहीत, ज्यांना स्वत:च्या सफारीची बटणं स्वत: लावता येत नाहीत, ज्यांना स्वत:च्या धोतराच्या निऱ्या स्वत: खोचता येत नाहीत, अशांच्या नावाचं कुंकू लावून काय करणार आहेस?
कमळाबाई- अरे पण भैया, चॉइस कुठं आहे? तेच डबकं, तिच कमळं अन् तीच देठं!
मोहनभैया- मग आपण डबकं स्वच्छ करू. त्याचा तलाव करू. नव्या कमळांनी सुशोभित करू!
कमळाबाई- अन् जुन्या कमळांचं काय करायचं?
मोहनभैया- त्यांना गणपतीच्या चरणावर वाहून टाकू- म्हणजे त्यांचं निर्माल्य होईल!
कमळाबाई- बघ बाबा, नाही तर जुनं बांधकाम पाडायचं अन् नव्याला परवानगी मिळायची नाही. बेघर व्हावं लागेल..
मोहनभैया- अगं, आपण दोनाचे दोनशे केले, आता पुन्हा दोन झाले तर दोन हजार करू.. कशाला काळजी करतेस?
कमळाबाई- (खूश होऊन) जुने जाऊ द्याऽऽऽ मरणालागुनीऽऽऽ
मोहनभैया- गप्प बैस ना.. फार बोंबाबोंब करू नकोस!
मोहनभैया- अगं, ‘शौर्य पुरस्कार’ म्हणायचं..
कमळाबाई- बरं! आणि सगळं नवं नवं आणायचं.. माणसं नवी, विचार नवा, आचार नवा!
मोहनभैया- थांब- थांब.. फार वाहवत जाऊ नकोस. माणसं फक्त नवी.. विचार आणि आचार जुनाच हवा! अगं, जुनं तेच सोनं असतं..
कमळाबाई- पण मग माणसांचं काय?
मोहनभैया- माणूस नाशिवंत आहे, विचाराला मृत्यू नाही. मी आज रात्रीच्या गाडीनं निघतो. आता नीट राहा. रात्रीची भटकू नकोस भुतासारखी..
कमळाबाई- ओके भैया!
0 comments:
Post a Comment