Sunday, September 6, 2009

चला चला चला चला
ऐक्याला चला
सुंद्राबाई, सखुबाई
बाबुराव, आबुराव
ऐक्याला चला
ऐक्याला चला हो, ऐक्याला चला..!
हं.. आलात? असे स्टेजावर चढा. आपापले हात असे उंच हवेत उचला. नको, नको.. ‘व्ही फॉर व्हिक्टरी’ची बोटे आताच नका दाखवू. तूर्तास फक्त हात दाखवा आणि हातही दाखविताना जरा काळजी घ्या. आपण जनतेला टाटा करतो आहोत, असं वाटलं नाही पाहिजे. किंवा मनातल्या मनात आपण एकमेकांना ‘हात दाखवितो आहोत’ असंही वाटलं नाही पाहिजे. आता आली का पंचाईत? बरं, असं करा, तुम्हाला वाटेल तसा हात उचला, फक्त तो ऐक्यासाठी उचललेला आहे, याची दलित जनतेला खात्री पटेल याची तेवढी काळजी घ्या. ‘काय म्हणता?’ तो काँग्रेसचा पंजा वाटतोय? अरारारारा! काँग्रेसचा पंजा तुमच्या मनात आहे राव, तो असा ऐन मोक्याच्या वेळी बाहेर येऊ देऊ नका आणि तुमचा हवेत उगारलेला पंजा फारच जर काँग्रेससारखा वाटत असेल तर मग मनगटावर बांधलेलं घडय़ाळही स्पष्ट दिसूद्यात. शर्टाच्या लांब बाह्या जरा वर खेचा. बाह्या खेचा म्हणजे, एकमेकांकडे सरसावून बघा असं नाही रे बाबांनो, बाह्या खेचा म्हणजे सगळ्यांची घडय़ाळं दिसू द्यात, एवढंच! झालं का हात उंचावून? अरे, असे रे कसे हात उंचावता? एकाचा डावीकडे तर एकाचा उजवीकडे, एकाचा मागे तर एकाचा पुढे, एकाचा तिरका तर एकाचा सरळ, एकाचा ढिला तर एकाचा ताठ! अरे, ऐक्यासाठी उचललेले हात कसे डौलात, एका रेषेत पाहिजेत. ऐक्य तुमच्या हालचालीत दिसलं पाहिजे आणि पंजाची बोटे अशी विलग नका ना ठेवू. कारण बोटे विलग असतील तर त्याचा काहीही अर्थ काढता येतो. म्हणजे, आमचं ऐक्य, पाच मिनिटे टिकेल, आमचं ऐक्य पाच तास, पाच दिवस, पाच महिनेच टिकेल.. काहीही! त्यातही लोकांनी, पाच महिने असा अर्थ घेतला तर ठीक, कारण तोवर निवडणुका होऊन जातील; परंतु पाच दिवस वगैरे घेतला तर सगळी मेहनत, स्टेजाचा खर्च, गाडय़ांचं पेट्रोल आणि इस्त्रीची बिलं सगळं वाया जाईल.. तर बिगी बिगी..

ऐक्याला चला, ऐक्याला चला
पंधरा वर्षांनी पुन्हा प्रदर्शित झालेल्या
शानदार ऐक्याला चला! ’ ’
वरच्या हाताचं झालं, आता खालच्या हाताचं काय करणार? नेहमी असंच होतं बघा. जो हात दिसतो, त्याच्याकडेच लोक बघत असतात. जो दिसत नाही, तोच खरं तर खरा असतो. म्हणूनच तर म्हणतात ना, ‘दाखवायचे हात आणि लपवायचे हात’ वेगळे असतात. तर, आता खालच्या हाताचं! आधी त्या मुठी सोडा बघू. अशा मुठींनी गैरसमज होतात. प्रत्येकाला वाटतं, की आपली झाकली मूठ सव्वा लाखांची आहे. पंधरा वर्षांनी असे एकत्र आलाच आहात, तर मुठी बांधून येऊ नका. लोक भले म्हणत असतील, कोणतीही गोष्ट खुल्या मनानं केली पाहिजे. पण लक्षात ठेवा, मन खुलं असण्यापेक्षाही मुठी खुल्या असणं महत्त्वाचं आहे. कारण मूठ बांधून असली आणि नावडता माणूस समोर आला तर मूठ वळू लागते आपोआप. त्यापेक्षा मूठ बांधूच नका, म्हणजे आपल्या ऐक्याला मूठ मारण्याची कोणाची हिंमतच होणार नाही. आता ऐक्याला ‘मूठ मारणं’ म्हणजे काय, ते मला नका विचारू. जरा उतरा स्टेजवरून खाली, फिरा कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे कळेल आपोआपच. तर, मुठीचं प्रकरण संपलं का? सोडल्या मुठा सगळ्यांनी? आता उभं राहताना एक पायजमावाला, एक पँटवाला, एक जॅकेटवाला, एक कोटवाला, एक टायवाला असे उभे राहा. दोन पायजामे बाजूबाजूला नकोत. ऐक्य म्हणजे काय? विविध पद्धतीची माणसं एकत्र येणं! आणि अशी विविधता असली, की ते टी. व्ही.वर दिसायलाही बरं दिसतं. हं! झालं, आली विविधता! आता सोडलेल्या मुठींच्या पंजाची बोटं जरा एकमेकांच्या बोटांत अडकवा की रे! दोन्ही हात उंचावण्यापेक्षा शेजारच्याचा हात हातात घेणं जास्त बरं. उगाचंच संकोच नको. आलाच आहात एकत्र, तर हात हातात गुंफा. गुंफा म्हणतोय मी, गुंता म्हणत नाही. गुंता म्हटलं, की पुन्हा तो सोडविण्यात वेळ जाईल आणि नुसता वेळच काढायचा असेल तर मग खुशाल गुंता. आता चेहऱ्यावर जरा हास्य येऊ द्या, की राव! ‘दिल को देखो, चेहरा ना देखो, चेहरों ने लांखो को लुटा, दिल सच्चा और चेहरा झुठा’ असं म्हणतात ते ठाऊक आहे हो! पण इथं ‘दिल’ दिसण्याची काही सोय नाही. दिसतात ते चेहरेच. तेव्हा आलं चेहऱ्यावर जरा हसू, तर बरं वाटेल की हो पाहणाऱ्यांनाही. तर आता आपला ‘द ग्रेट ऐक्य शो’ सुरू होतोय. मेहेरबान, कदरदान अटेंशन प्लीज! सगळी जुळवाजुळव झाली आहे. घडय़ाळवाल्या साहेबांनी दगा दिला, हातवाल्यांनी धोका दिला, समविचारींनी असा अविचार केला, तर मग जे समविचारी नाहीत, त्यांचा काय म्हणून भरवसा ठेवायचा. म्हणून म्हणतो,
ऐक्याला चला, ऐक्याला चला
बिगी बिगी, पटापटा ऐक्याला चला
गटागटानं, तटातटानं ऐक्याला चला!

आन आता शेवटची गोष्ट! ऐक्याचे असे ग्रेट शो करण्यासाठी नेमका निवडणुकांचाच मुहूर्त का मिळतो नेहमी, हे मला, कुणी कुणाला विचारू नका. तेव्हा, नेमकं एवढंच विचारायचं नाही, अशी शपथ घ्या आणि मग ऐक्याला चला, ऐक्याला चला
असे माझ्या मागं मागं..

0 comments:

  © Blogger templates Psi by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP